वाचक लिहितात   

बौद्धिक संपदेचे नुकसान

हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन २०२४’ च्या अहवालानुसार २४ साली ४३०० तर गतवर्षी ५१०० भारतीय अब्जाधीश भारत देशाचा त्याग करून विदेशात स्थलांतरित झाले आहेत. भारतात राहून संपत्ती , कीर्ती मिळवायची आणि संधी मिळताच ’छू मंतर’ व्हायचे वर पुन्हा इतरांना मात्र राष्ट्रवादाचे उपदेशांमृत पाजायचे ? १९९० पर्यंत विदेशात स्थायिक होणार्‍या भारतीयांची संख्या २० लाख होती ती आज जगातील १०० हून अधिक देशांत साडेतीन कोटींवर पोहोचली आहे. मागील दोन दशकांत विदेशात स्थायिक होणार्‍या भारतीयांच्या संख्येत ३५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ’रेमिटन्सेस’ बाबत आज भारताने चीनला पछाडले आहे. गेल्या दोन अडीच दशकांत आपल्याकडे गुणवंतांच्या यादीत झळकलेल्यांपेंकी निम्म्याहून अधिक चमकू विद्यार्थी आज भारतात नसल्याचे विदारक वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर गेल्या पाच वर्षांत सहा लाखांहून अधिक भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग करून विदेशी नागरिकत्व स्विकारल्याची आकडेवारी सांगते. भारतातील ’बौद्धिक - सांपत्तिक प्रवाहो चालला विदेशी !’ अशी परिस्थिती नक्कीच आहे. यातून आपल्या देशाचे आर्थिक आणि बौद्धिक संपदेचे मोठे नुकसान होत आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

कायदे कठोर हवेत

महिलांवर, मुलींवर लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढचं होताना दिसते. जेवढे कायदे कडक आहेत तेवढ्या पळवाटाही आहेत कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे  होताना दिसत नाही महिला अथवा मुलींच्यावर जे अत्याचार करणारे किंवा यासारख्या घटनेतील गुन्हेगार आहेत ते या गुन्ह्यांमधून सहीसलामत सुटून उजळ माथ्याने समाजामध्ये फिरतात त्यामुळे पुन्हा त्यांना असे गुन्हे करण्यास वाव मिळतो,गुन्हेगारांना कायद्यांची भीतीचं उरलेली नाही. ज्यावेळी घटना घडते त्यावेळीच त्याची जास्त चर्चा होताना दिसते काही कारवाया होतात  नंतर ती घटना मागे पडते, लोक विसरुन जातात तोपर्यंत दुसरी घटना कानी पडते हे असेच किती दिवस चालणार ? 

राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव 

हवेची गुणवत्ता घसरली

सध्या मुंबई आणि उपनगरात, काही ठिकाणी हवेची  गुणवत्ता पार घसरलेली आहे.  ही चिंतेची बाब आहे.  बोरिवली (पूर्व),  भायखळ्यातील हवेचा स्तर घासरल्याने,  हे प्रदूषण टाळण्यासाठी, त्यावर बांधकामबंदीचा निर्णय लागू केला आहे. पालिका  आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. परंतु हा कायमस्वरूपी इलाज होऊ  शकत नाही.तर ही तात्पुरती मलमपट्टीच आहे, म्हणावेसे वाटते. याचे कारण प्रदूषण हे बाराही महिने, कायम या ना त्या मार्गाने होतच असते. एकीकडे उत्तुंग इमारतींची कामे चालू असतात. त्याच्या धुळीचा, सिमेंटचा, तसेच यंत्राचा आवाज आजूबाजूच्या जनतेला होत असतो. तर दुसरीकडे सध्या जागोजागी मेट्रोची कामे चालू आहेत. त्याच्या धूळ, मातीचा जनतेला त्रास होत असतो. रस्ते अरुंद झाल्यामुळे, वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पुर्व), मुंबई   

लेखकांची फाळणी करू नका

नागपूर येथे शासकीय सेवेतील लेखकांचे साहित्य संमेलन झाले. या संमेलनात शासकीय कर्मचारी व अधिकारी असणार्‍या लेखकांसाठी शासनाने पुरस्कार द्यावे असा ठराव घेण्यात आला. ही साहित्याची व लेखकांची चक्क फाळणी होय. यामुळे साहित्य जगतात मतभेद होतील. साहित्य हे विभागल्या जाईल व लेखकांची फाळणी होऊन वाद विवाद होतील.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

बँक विषयक तक्रारीत वाढ

देश विदेशातील बँका लोकांच्या पैशांसंबंधी सोयी सुविधा पुरवित असतात.  बँकांच्या सोयींमध्ये बचत खाते, फिक्स्ड डीपॉझिट्स, (मुदत ठेवी ) तारण, विनातरण कर्जांच्या सोयी, पैशांची दुसर्‍या ठिकाणी ने आण करणे, क्रेडिट डेबिट कार्ड्स अशा प्रकारच्या सोयी जसजशा वाढत आहेत त्या प्रमाणात त्या सोयींबद्दल तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत जात आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांकडून पुरविल्या जाणार्‍या सोयींविरोधात नोंदविल्या गेलेल्या तक्रारींचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडे ९.३४ लाख तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात कर्जदारांच्या ८५,२८१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग विरोधात ५७२४२ तक्रारी, ठेवी आणि संबंधित खात्यांबद्दल ४६,३५८ आणि क्रेडिट कार्डांच्या बाबतीत ४२,३९३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. बँक ग्राहकांच्या बँकांविरोधात तक्रारी वाढल्या आहेत असा निष्कर्ष निघतो. 

राजन पांजरी, जोगेश्वरी.

 

Related Articles